प्र.१. अचूक सहसंबंध ओळखा.
(A : विधान, R : कारण)
१) A : अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.
R : लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैदयकीय खर्च वाढतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
२) A : लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.
R : लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
प्र. २ टीपा लिहा.
१) लोकसंख्या वाढ व स्थलांतर
उत्तर : सर्वसाधारणतः लोकसंख्या वाढ ही नैसर्गिक कारणांमुळे होताना दिसते. जेव्हा मृत्युदरापेक्षा जन्मदर जास्त असतो, तेव्हा त्या प्रदेशाची लोकसंख्या सर्वसाधारण पद्धतीने वाढताना दिसते. मात्र, लोकसंख्या वाढीमध्ये नैसर्गिक वाढ हा एकमेव घटक नाही. एखाद्या प्रदेशाच्या लोकसंख्येत विशेषतः लोकसंख्या वाढीत स्थलांतरित घटकाचाही महत्त्वपूर्ण समावेश असतो. स्थलांतरास घटक कारणीभूत असतात, यात प्रमुख प्राकृतिक, सामाजिक आणि राजकीय घटकांचा समावेश होतो. मात्र, या घटकांपेक्षाही स्थलांतरामागील प्रेरणा ही स्थलांतरास जास्त कारणीभूत असते. उत्तम हवामान, रोजगाराच्या आकर्षक संधी, उत्कृष्ट राहणीमानाचे आकर्षण, शहर दर्शन या प्रेरणा आकर्षण स्थलांतरास कारणीभूत ठरतात. त्याच वेळेस आपत्ती, राजकीय संघर्ष किंवा कलह, युद्ध, युद्धजन्य परिस्थिती, सामाजिक कलह, सामाजिक दंगे, वांशिक दंगे, उद्योगांची टाळेबंदी, साधनसंपत्तीचा तुटवडा, दुष्काळ यांसारख्या कारणांमुळे अपकर्षण स्थलांतर होते. स्थलांतराच्या प्रक्रियेत स्थलांतरित देणारा प्रदेश आणि स्थलांतरीत घेणारा प्रदेश असे दोन प्रदेश समाविष्ट असतात. स्थलांतरित घेणाऱ्या प्रदेशात स्थलांतरामुळे लोकसंख्येत खूप वाढ होताना दिसते. प्रामुख्याने विविध महानगरे आणि विकसित देश आढळतात. अशा देशांची किंवा प्रदेशांची लोकसंख्या स्थलांतरामुळे वाढते.
२) लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर.
उत्तर : मानवी लोकसंख्येत विविध वयोगटांच्या व्यक्ती असतात. ज्यामध्ये नवजात अर्भक, शिशु, बालक, कुमार, युवक, प्रौढ़, वृद्ध आणि अतिवृद्ध लोकांचा समावेश होतो. अर्थात हे वयोगट अगदी ढोबळ आहेत. अभ्यासाच्या दृष्टीने असे वयोगट करताना वयोगटाची रचना ०-५, ५-१०, १०-१५, १५-२०, २०-२५ अशाप्रकारे १०० वर्षांपर्यंत विविध गटामध्ये केली जाते. प्रत्येक वयोगटातील लोकांची संख्या जर एका आलेखाद्वारे व्यक्त केली, तर जी रचना प्राप्त होते त्याला लोकसंख्या मनोरा म्हणतात. अशाप्रकारे लोकसंख्या मनोरा तयार करताना, प्रत्येक वयोगटात पुरुष आणि स्त्रियांचे प्रमाण अशी वर्गवारी करून हा वय लिंग मनोरा तयार केला जातो. थोडक्यात वय लिंग मनोऱ्यात वय रचना आणि लिंग रचना किंवा लिंग गुणोत्तर या दोन्ही घटकांची माहिती मिळते. लोकसंख्या मनोऱ्याचे विस्तारणारा, संकोचणारा आणि स्थिरावलेला असे तीन प्रकार आढळतात. सर्वसाधारणपणे विस्तारणाऱ्या लिंग मनोऱ्यात ० ते १५ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असतेच, मात्र, त्यातही पुरुषांचे प्रमाण जास्त असते आणि स्त्रियांचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ स्त्री जन्मदराचे प्रमाण कमी असते किंवा या वयोगटातील स्त्रियांच्या जीविताचे प्रमाण कमी असते. याचाच परिणाम पुढे कार्यशील गटातही दिसून येतो आणि १५, ३०, ५९ या कार्यशील गटातील लोकसंख्येतही स्त्रियांचे प्रमाण कमी दिसते. याउलट, स्थिरावलेल्या वयोगटात साधारणतः प्रत्येक वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांचे प्रमाण सारखेच दिसते. स्थिरावलेला वयोगट हा विकसित देशांचे प्रतिनिधित्व करतो. याचा अर्थ देशाचा आर्थिक, सामाजिक विकास आणि स्थिर लोकसंख्येचा वय लिंग मनोरा यांचा परस्परसंबंध दिसून येतो.
३) लोकसंख्येची व्यावसायिक संरचना.
उत्तर : लोकसंख्येची व्यावसायिक संरचना अभ्यासताना त्यात केवळ १५ ते ५९ वयोगटातील कार्यशील लोकसंख्येचे प्रमाणच गृहीत धरले जाते. १५ ते ५९ वयोगटातील कार्यशील लोकसंख्येचे व्यवसायानुसार वर्गीकरण म्हणजे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना होय. कार्यशील लोकसंख्येपैकी काही लोक प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक अशा विविध व्यवसायात कार्यरत असतात. अर्थात, या विविध व्यवसायांतील कार्यशील लोकसंख्येचे प्रत्यक्ष प्रमाण किंवा टक्केवारी आणि देशाची आर्थिक व सामाजिक स्थिती यांचा परस्परसंबंध आहे. एखाद्या प्रदेशात प्राथमिक व्यवसायात जर कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल, तर असा देश विकसनशील देश दिसून येतो. यालाच कृषिप्रधान अर्थव्यवस्था म्हणतात. याला कारण प्राथमिक व्यवसायात लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांत लोकसंख्येचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ पायाभूत सेवा-सुविधा, उदयोग आणि कुशल मनुष्यबळ लागणारे विविध व्यवसाय अशा प्रदेशात कमी विकसित झालेले दिसतात.
मात्र, जशी लोकसंख्येची कार्यकुशलता वाढते, तसे प्राथमिक व्यवसायातील लोकसंख्येचे प्रमाण कमी होत जाते आणि द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांतील लोकसंख्येचे प्रमाण वाढते. शैक्षणिक सेवा-सुविधा वाढतात, तंत्रज्ञानाच्या आधारे विविध उदयोग- व्यवसाय वाढतात व साधनसंपत्तीची निर्मिती होते. पायाभूत सेवा सुविधा निर्माण केल्या जातात आणि या तांत्रिक प्रगतीच्या आधारे प्राथमिक व्यवसायात कमी लोकसंख्या कार्यरत असूनही प्राथमिक व्यवसाय उत्तम प्रकारे कार्यरत राहतात. याला उद्योगप्रधान अर्थव्यवस्था असेही म्हणतात. अर्थात हे उद्योग आर्थिकदृष्ट्या विकसित असतात.
४) साक्षरतेचे प्रमाण.
उत्तर : लोकसंख्या घटकांमध्ये साक्षरतेचे प्रमाण हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. साक्षरतेचे प्रमाण हा लोकसंख्येचा किंवा त्या प्रदेशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचाही मापदंड मानला जातो. प्रत्येक प्रदेशाची किंवा देशाची साक्षरतेची व्याख्या वेगळी आहे. भारतामध्ये साक्षरतेचे प्रमाण ठरवण्यासाठी ७ वर्षांवरील व्यक्ती हा मूळ आधार मानला जातो. ७ वर्षांवरील व्यक्तीस किमान एक तरी भाषा लिहिता-वाचता येणे व किमान दैनंदिन जीवनात आवश्यक अंकगणिती क्रिया समजून करता येणे या घटकांच्या आधारे व्यक्ती साक्षर आहे किंवा नाही हे ठरवले जाते. काही देशात साक्षरता ठरवण्यासाठी किमान वयाची अट १५ वर्षे धरली जाते, तर काही विकसित देशात साक्षरतेमध्येही विविध श्रेणी केलेल्या आढळतात. साक्षरता आणि देशाच्या विकासात लोकांचे राहणीमान व स्त्रियांचा समाजातील दर्जा याचा थेट संबंध दिसतो. खरतर साक्षरता आणि देशाचा विकास हे परस्परपूरक असून ते एकमेकांशी कार्यकारणसंबंध दर्शवतात. साक्षरता जेवढी जास्त तेवढी देशाच्या विकासाची शक्यता जास्त आणि देशाचा विकास जेवढा जास्त तेवढे साक्षरतेचे प्रमाण जास्त. म्हणजेच साक्षरता हे आर्थिक विकासाचे कारण आणि परिणाम असे दोन्ही निकष पूर्ण करते.
साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यास कार्यशील लोकसंख्येचा दर्जाही उंचावतो. अशी लोकसंख्या अर्थातच द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक श्रेणीच्या व्यवसायात जास्त प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे साधनसंपत्तीची निर्मिती होते. देशाची आर्थिक वृद्धी होते. लोकांचे राहणीमान सुधारते. वाहतूक, उदयोग, शिक्षण, वैद्यकीय सेवा-सुविधा यांत वाढ होते. या सर्वांमुळे देशाची आर्थिक विकासाची पातळी उंचावते आणि या जास्त आर्थिक विकासामुळे पुन्हा शासनाचे शिक्षणासंबंधीचे धोरण बदलते. अधिकाधिक शैक्षणिक सेवा-सुविधा पुरवल्या जातात. शिक्षणावरही जास्त जोर दिला जातो आणि लोकसंख्या अधिक कार्यकुशल व कार्यशील कशी होईल यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. म्हणूनच एखाद्या देशाची साक्षरता आणि आर्थिक विकास हे परस्परपूरक आहेत असे म्हटले जाते.
प्र. ३. भौगोलिक कारणे लिहा.
१) विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे.
उत्तर : विकसित देशांमध्ये कार्यशील लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या ही द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांत आढळते. देशाचा आर्थिक विकास झाला असल्यामुळे तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यांमुळे या व्यवसायात रोजगाराच्या अधिक संधी असतात. त्याच वेळेस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीसारख्या प्राथमिक व्यवसायात कमी लोकसंख्येच्या जोरावरही शेती व्यवसाय उत्तम प्रकारे केला जातो आणि भरपूर उत्पन्न मिळवले जाते. या सर्व कारणांमुळे विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे.
२) लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.
उत्तर : साक्षरतेचे प्रमाण वाढत जाते, तसा लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारतो. स्त्रियांनाही समाजात चांगला दर्जा प्राप्त होतो. साक्षरतेमुळे मनुष्याची कार्यकुशलता वाढते आणि त्यामुळे प्राथमिक व्यवसायाव्यतिरिक्त त्याला द्वितीयक व तृतीयक व्यवसायांतील संधीही मिळू शकतात. साक्षरतेच्या प्रमाणाचा व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीशीही थेट संबंध आहे आणि याचप्रमाणे देशाच्या आर्थिक विकासाचा लोकांच्या साक्षरतेशीही थेट संबंध आहे. साक्षरता जेवढी जास्त तेवढी देशाच्या विकासाची शक्यता जास्त आणि त्याचप्रमाणे देशाच्या विकासाचे प्रमाण जेवढे जास्त असते. त्याप्रमाणे शैक्षणिक सुविधांची उपलब्धता आणि शासकीय धोरण यांचाही प्रभाव साक्षरतेवर होतो. एकाअर्थी लोकसंख्येची साक्षरता आणि देशाचा सामाजिक, आर्थिक विकास हे परस्परपूरक आहेत. इतकेच नव्हे तर, साक्षरता ही देशाच्या आर्थिक विकासाचे कारण व परिणाम असे दोन्ही घटक आहेत असे म्हणता येईल.
३) जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते, तेव्हा लोकसंख्या लाभांशातही वाढ होते.
उत्तर : एखाद्या देशातील कार्यशील लोकसंख्येच्या प्रमाणाचा संबंध प्रामुख्याने देशातील जन्म मृत्युदर या घटकाशी निगडित आहे आणि हाच घटक वय लिंग मनोऱ्यातून स्पष्टपणे दिसून येतो. जेव्हा जन्मदर खूप जास्त असतो, तेव्हा ० ते १५ या वयोगटातील अवलंबित लोकांची संख्या जास्त असते. मात्र, जसजसा लोकसंख्येचा वृद्धिदर कमी होत जातो, तसे ० ते १५ वयोगटातील लोकांची संख्या कमी होत जाते, मात्र तेव्हाच १५ ते ५९ या कार्यशील गटातील लोकसंख्येचे प्रमाण वाढत जाते. जसजसे कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढत जाते, तसतसा देशावरील आर्थिक भारही कमी होतो आणि तेव्हाच ही उपलब्ध कार्यशील लोकसंख्या विविध व्यवसायात कार्यरत होते. त्यामुळे एकूणच आर्थिक वृद्धी होऊन संपत्तीची निर्मिती होते. याचा थेट परिणाम आर्थिक विकासावर होतो आणि या आर्थिक विकासाचे लाभ देशातील लोकसंख्येला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात मिळतात. लोकांचे उत्पन्न वाढते, राहणीमान सुधारते. वाहतूक, शिक्षण, आरोग्य यांसारख्या सेवा-सुविधात वाढ होते. एका आर्थिक कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढल्यामुळे मिळणारा लाभ आवश्यक असतो. म्हणूनच कार्यशील लोकसंख्येत वाढ होते, तेव्हाच लोकसंख्या लाभांश वाढतो असे म्हटले जाते..
४) स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही.
उत्तर : एखाद्या ठरावीक ठिकाणी कायम वस्ती करून राहणे हा सध्या मानवाचा स्थायीभाव झाला आहे. त्यामुळे स्थलांतर हा घटकच मुळात कुठल्यातरी कारणामुळे व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास भा पाडते. कारण काही वेळेस आकर्षणही असते, रोजगाराची संधी, उत्तम राहणीमान, आल्हाददायक हवामान यांसारख्या काही आकर्षक कारणांमुळे व्यक्ती स्वतःहून स्थलांतरित होते. त्यामुळे असे स्थलांतर बहुतांशी कायमस्वरूपी असते. मात्र, आकर्षणापेक्षाही अपकर्षक कारणामुळे होणारे स्थलांतर व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध असते. नैसर्गिक आपत्ती, सामाजिक संघर्ष किंवा कलह, देशाच्या किंवा प्रदेशाच्या फाळणीसारखी राजकीय कारणे अशा अपकर्षणांमुळे जेव्हा स्थलांतर होते, तेव्हा असे स्थलांतर हे कायमस्वरूपी असते असे नाही. त्यामुळेच प्रत्येक स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असत नाही.
प्र. ४. फरक स्पष्ट करा.
१) देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश
| देणारा प्रदेश | घेणारा प्रदेश |
|---|---|
| (१) ज्या प्रदेशातून लोक स्थलांतरित होतात, त्या मूळ प्रदेशाला देणारा प्रदेश म्हणतात. | (१) मूळ प्रदेशातून लोक ज्या प्रदेशात स्थलांतरित होतात, अशा प्रदेशाला घेणारा प्रदेश म्हणतात. |
| (२) स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना आणि गुणवैशिष्ट्ये बदलतात. | (२) स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना आणि गुणवैशिष्ट्ये बदलतात. |
| (३) स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होते, तसेच तेथील लोकसंख्येची घनताही कमी होते. | (३) स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या जास्त होते, तेथील लोकसंख्येची घनता वाढते. |
| (४) स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील वय रचना बदलते; बहुतांशी वेळेस लिंग गुणोत्तर बदलते आणि दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण वाढते. | (४) स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशातील कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढते; लिंग गुणोत्तर बदलते आणि दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी आढळते. |
| (५) देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी झाल्यामुळे काही वेळेस शेती उदयोगासारख्या स्थानिक आर्थिक व्यवसायांना मजुरांचा तुटवडा पडतो. | (५) घेणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या जास्त झाल्यामुळे बेकारी वाढते, काही वेळेस मजुरांचे किंवा स्थलांतरित लोकांचे शोषण होते. |
| (६) काही निवडक प्रदेशांत स्थलांतरित झालेल्या लोकांच्या मनिऑर्डर वर देणाऱ्या प्रदेशांचा काही प्रमाणात विकास होताना दिसतो. | (६) घेणाऱ्या प्रदेशात घरांचा तुटवडा, झोपडपट्टी, गुन्हेगारी, वाहतूक कोंडी, प्रदूषण अशा समस्या उद्भवतात. |
2) विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा
| विस्तारणारा मनोरा | संकोचणारा मनोरा |
|---|---|
| (१) या मनोऱ्याचा तळ खूप विस्तारलेला असतो आणि शीर्षाकडे मनोरा निमुळता होत जातो. | (१) या मनोऱ्याचा तळ संकुचित असतो, मात्र शीर्षाकडे या मनोऱ्याचा विस्तार वाढत जातो. |
| (२) यावरून जन्मदर जास्त आणि वाढत्या वयानुसार मृत्युदर वाढता ही दोन वैशिष्ट्ये दिसून येतात. | (२) यावरून जन्मदर कमी असतो, मात्र मृत्युदरातही लक्षणीय घट दिसून येते. |
| (३) त्यामुळेच जन्मदर जास्त असल्यामुळे अवलंबित लोकांची संख्या जास्त असते. | (३) त्यामुळेच जन्मदर कमी असल्यामुळे अवलंबित लोकांची संख्याही कमी दिसते. |
| (४) मात्र, जन्मदर जास्त असल्यामुळे वृद्धांची संख्या कमी असते. | (४) मात्र, मृत्युदर घटत असल्यामुळे वृद्धांची संख्या जास्त दिसून येते. |
प्र.५. सविस्तर उत्तरे लिहा
(१) लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर : लोकसंख्येचा अभ्यास करण्याचे विविध घटक आहेत आणि या घटकांपैकी लोकसंख्येचे वय आणि लिंग रचनेप्रमाणे वर्गीकरण करून केलेला अभ्यास अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकतो.
'मानवी लोकसंख्येत विविध वयोगट असतात. ज्यामध्ये नवजात अर्भक, शिशु, बालक, कुमार, युवक, प्रौढ, वृद्ध आणि अतिवृद्धि लोकांचा समावेश होतो. अर्थात, हे वयोगट अगदी ढोबळ आहेत. अभ्यासाच्या दृष्टीने लोकसंख्येचा अभ्यास करताना हे वयोगट एका विशिष्ट पद्धतीने पाडले जातात. रचना ही सर्वसाधारणतः ०-५ ५-१०, १०-१५, १५-२०, २०-२५ अशाप्रकारे १०० वर्षांपर्यंत विविध गटांमध्ये केली जाते. प्रत्येक वयोगटातील लोकांची संख्या जर एका आलेखाद्वारे व्यक्त केली, तर जी रचना प्राप्त होते त्याला 'लोकसंख्येचा मनोरा' म्हणतात.
प्रत्येक वयोगटात त्यापुढे पुरुष आणि स्त्रिया असे वर्गीकरण करून जेव्हा असा मनोरा तयार केला जातो, तेव्हा त्याला 'लोकसंख्येचा वय लिंग मनोरा' म्हणतात. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील पुरुषांचे आणि स्त्रियांचे प्रमाण संख्या किंवा टक्केवारी या स्वरूपात कळते.
लोकसंख्येच्या वय-लिंग मनोऱ्याच्या आधारे एखाद्या देशाचे किंवा प्रदेशाचे लोकसंख्येचे जन्मदर व मृत्युदर आणि इतर वैशिष्ट्ये समजतात. लिंग मनोऱ्याचे साधारणतः तीन प्रकार आढळून येतात : (१) विस्तारणारा वय-लिंग • मनोरा (२) संकोचणारा वय-लिंग मनोरा आणि (३) स्थिरावलेला किंवा संतुलित वय-लिंग मनोरा.
विस्तारलेला मनोरा जास्त जन्मदर आणि जास्त मृत्युदर दर्शवतो. त्यामुळे एकीकडे १० ते १५ या वयोगटातील अवलंबित लोकसंख्येची टक्केवारी जास्त असल्याचे या मनोऱ्यावरून कळते. मात्र, त्याच वेळेस ६० व त्यावरील अधिक वयाच्या वृद्ध व्यक्तींचे प्रमाण कमी असल्यामुळे त्या प्रदेशाचा मृत्युदर जास्त असल्याचेही समजते.. थोडक्यात, हा मनोरा एखाद्या विकसनशील देशाचा लोकसंख्या वय लिंग मनोरा असल्याचे सहज समजून येते.
याउलट, स्थिरावलेला किंवा संतुलित वय-लिंग मनोरा हा कमी जन्मदर तसेच कमी मृत्युदर ही दोन वैशिष्ट्ये ठळकपणे दर्शवतो. प्रत्येक वयोगटात पुरुष आणि स्त्रियांच्या संख्येत एक समानता आढळते आणि त्याच वेळेस जन्मदर कमी म्हणून ० ते १५ वयोगटातील अवलंबित लोकसंख्येची संख्या कमी आणि मृत्युदर कमी त्यामुळे ६० व त्यावरील अधिक वयाच्या लोकांच्या संख्येचे प्रमाण जास्त ही दोन ठळक वैशिष्ट्ये दिसतात. त्याच वेळेस १५ ते ५९ या वयोगटातील कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण ह्या देशात जास्त असल्याचे दिसते. एकंदरीत कमी मृत्युदर म्हणजे उत्तम वैदयकीय सेवा-सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास, उत्तम राहणीमान या गोष्टी दिसून येतात. कमी जन्मदर म्हणजे शिक्षण आणि शैक्षणिक प्रगती दर्शवते आणि त्याच वेळेस कार्यशील लोकसंख्येचे चांगले प्रमाण हे आर्थिक विकासाचा दर्जा दर्शवते.
वय - लिंग मनोऱ्यातून एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या लाभांश याबद्दलही माहिती समजून येते. विस्तारलेला मनोरा हा आज जरी अवलंबित लोकांची संख्या जास्त असल्याचे दाखवत असला, तरी अशा प्रदेशात भविष्यकाळात लोकसंख्या वृद्धिदर कमी होऊन म्हणजेच, जन्मदर कमी होऊन कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढत जाऊन त्याचा फायदा त्या देशाला लोकसंख्या लाभांशाच्या स्वरूपात मिळतो हे अनेक बाबतीत दिसून आलेले आहे. विस्तारणाऱ्या देशाचा वय-लिंग मनोरा हा पुढे संतुलित मनोऱ्यात परावर्तित होतो. या स्थित्यंतरादरम्यान जन्मदर कमी होते, शिक्षणाचा दर्जा वाढतो, प्राथमिक व्यवसायाबरोबरच द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक व्यवसायांचे प्रमाणही वाढते. पायाभूत सेवा सुविधा, उद्योग, सेवाक्षेत्र यांचा विस्तार होतो. रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतात, राहणीमान सुधारते, वैद्यकीय सेवा सुविधा वाढतात आणि त्यामुळे हळूहळू मृत्युदर कमी झाल्यामुळे ६० व त्यावरील लोकांचे प्रमाण वाढत जाते. या एकूण आर्थिक-सामाजिक विकासाचा प्रत्यक्ष- • अप्रत्यक्ष लाभ त्या देशातील किंवा प्रदेशातील सर्व लोकांना विकासाच्या स्वरूपात मिळतो त्यालाच लोकसंख्येचा लाभांश म्हणतात.
थोडक्यात, लोकसंख्येच्या वयरचनेच्या अभ्यासामुळे लोकसंख्येतील अवलंबित लोकांचे प्रमाण, कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण, वृद्धांचे प्रमाण, आर्थिक विकासाचा स्तर, लोकसंख्या लाभांशाचे स्वरूप आणि लिंग गुणोत्तर अशा विविध घटकांचा अभ्यास लोकसंख्या वय रचनेतून करता येतो.
२) लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना स्पष्ट करा.
उत्तर : लोकसंख्येच्या अभ्यासात लोकसंख्येचे विविध घटक अभ्यासले जातात. लोकसंख्येच्या विविध घटकात लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची घनता, साक्षरता वयरचनेनुसार लोकसंख्येचे वितरण आणि वर्गीकरण, लिंग रचनेनुसार लोकसंख्येचे वर्गीकरण, स्थलांतराची कारणे आणि स्थलांतराचा उद्देश, अशा विविध प्रकारे लोकसंख्येचा अभ्यास केला जातो.
अशाच प्रकारे लोकसंख्येचा अभ्यास हा लोकांच्या वास्तव्याच्या ठिकाणावरूनही केला जातो. लोकसंख्या वास्तव्याच्या ठिकाणावरून लोकसंख्येचे ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या असे वर्गीकरण करता येते. ग्रामीण आणि शहरी वसाहतीतील लोकसंख्येची काही विशेष वैशिष्ट्ये दिसून येतात. लोकसंख्येचे राहणीमान, त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप, सामाजिक रचना, वय रचना, लिंग गुणोत्तर, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येच्या घनतेचे वितरण आणि विकासाचा स्तर या सर्व वैशिष्ट्यांबाबत ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येत लक्षणीय फरक दिसून येतो.
सर्वसाधारणतः ग्रामीण लोकसंख्या ही प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली दिसते. येथे लोकसंख्येची एकूण घनता ही कमी असते. त्याच प्रमाणे आर्थिक विकासाचा स्तरही कमी असल्यामुळे पायाभूत सेवा सुविधा, वैदयकीय सेवा-सुविधा, शिक्षणाच्या सेवा सुविधा या शहरी भागाच्या तुलनेत कमी विकसित असतात. बहुतांशी स्थलांतरितांच्या प्रकरणात ग्रामीण भाग हा स्थलांतरित देणारा प्रदेश असतो आणि ग्रामीण भागातून शहरी भागाकडे, विकसित भागाकडे स्थलांतर होत असते. याचा परिणाम ग्रामीण भागातील वय रचना आणि लिंग गुणोत्तरावर होताना दिसतो. अनेक वेळेस शेती आणि स्थानिक ग्रामीण उदयोगांना कार्यकुशल मजुरांची कमतरताही भासते.
या तुलनेत शहरी लोकसंख्या ही प्रामुख्याने द्वितीयक व तृतीयक व्यवसायांत कार्यरत असते. शहरी भाग हा स्थलांतरित घेणारा प्रदेश असतो. साहजिकच येथे लोकसंख्या आणि लोकसंख्येची घनता या दोन्ही बाबी जास्त असतात. स्थलांतरितांमध्ये प्रामुख्याने कार्यशील अशा १५ ते ५९ वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शहरांमध्ये लिंग गुणोत्तरही असमान असते आणि पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येच्या तुलनेत जास्त असते. शहरांमध्ये द्वितीयक तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांचा विकास झालेला असतो. पायाभूत सुविधा, वैद्यकीय सेवा सुविधा, शैक्षणिक सेवा-सुविधा या ग्रामीण प्रदेशांच्या तुलनेत चांगल्या प्रकारे उपलब्ध असतात. त्यामुळे एकंदरीत राहणीमानही चांगले असते. मात्र, काही प्रदेशात आणि काही शहरात जास्त लोकसंख्येमुळे आणि जास्त लोकसंख्या घनता यांमुळे निवासाच्या समस्या निर्माण होतात. घरांच्या किमती खूप जास्त असतात आणि त्यामुळे झोपडपट्टी निर्माण होतात.
थोडक्यात वास्तव्याच्या ठिकाणावरून लोकसंख्येचे ग्रामीण आणि शहरी असे वितरण अभ्यासले, तर त्यात खूप लक्षणीय फरक दिसून येतात.
(३) स्थलांतराचा देशातील लोकसंख्या रचनेवर होणारा परिणाम स्पष्ट करा.
उत्तर : व्यक्ती किंवा समूहाचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे तात्पुरते किंवा कायम स्वरूपात होणारे स्थानांतरण म्हणजे स्थलांतर होय. खरे म्हणजे एका जागी स्थिर होण्याचा, वस्ती करण्याचा मानवी स्वभाव आहे.
त्यातूनच ग्रामीण किंवा शहरी वसाहती उदयास येतात. मात्र, काही प्रसंगी काही आकर्षण किंवा अपकर्षण करणांमुळे व्यक्ती किंवा समूह स्वेच्छेने किंवा अनिच्छेने एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जातात आणि स्थलांतराची प्रक्रिया घडून येते.
कारणांपेक्षाही स्थलांतरामागची प्रेरणा ही जास्त प्रभावी ठरते. आकर्षण आणि अपकर्षण प्रेरणा शेवटी स्थलांतरास प्रत्यक्ष उद्युक्त करतात. रोजगाराच्या संधी, आर्थिक विकास, शहरांचे आकर्षण, उच्च राहणीमान, शिक्षण, स्थलांतरास विविध प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घटक कारणीभूत असतात. मात्र, या वैदयकीय वाहतूक यांसारख्या सेवा सुविधा यामुळे जेव्हा व्यक्ती किंवा समूह स्वेच्छेने स्थलांतर करतो, ते स्थलांतर आकर्षण कारणीमुळे घडून येते. याउलट नैसर्गिक आपत्ती, राजकीय सामाजिक संघर्ष, युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती, देशाची किंवा प्रदेशाची फाळणी, अशा परिस्थितीत जी व्यक्ती किंवा समूह स्थलांतरित होण्यास भाग पाडले जातात, तेव्हा त्यास अपकर्षण घटकांमुळे होणारे सक्तीचे स्थलांतर म्हणतात. कोणत्याही कारणामुळे स्थलांतर झाले, तरी शेवटी त्याचा परिणाम हा स्थलांतरित देणाऱ्या आणि स्थलांतरित घेणाऱ्या अशा दोन्ही प्रदेशांवर आणि देशांवर होतो.
स्थलांतरित देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होते, लोकसंख्या घनताही कमी होते. स्थानिक पायाभूत सेवा- सुविधा कमी प्रमाणात वापरल्या जातात. अनेक वेळेस स्थानिक पातळीवर कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेती, ग्रामीण उद्योग यांसारख्या व्यवसायांना कार्यशील मजुरांची कमतरता भासते. लिंग गुणोत्तर सकारात्मक होते. याउलट, स्थलांतरित घेणाऱ्या परदेशातील लोकसंख्या नैसर्गिक पद्धतीने वाढते. लोकसंख्येची घनताही वाढते. घरांची मागणी वाढल्यामुळे घरांच्या किमती वाढतात, त्यातून झोपडपट्ट्यांची निर्मिती होते. स्थानिक सेवा-सुविधा, वाहतूक, वैदयकीय आणि शिक्षणाच्या सेवा-सुविधा यांवर प्रचंड ताण पडतो. आर्थिक आकर्षण काळाच्या ओघात कमी आकर्षक ठरतात. यामुळे कधीकधी उलट स्थलांतरही घडून येते.
थोडक्यात, स्थलांतरामुळे देणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोन्ही प्रदेशातील लोकसंख्या घनता व रचना, लिंग गुणोत्तर, कार्यशील आणि अवलंबित लोक यांचे प्रमाण अशा विविध घटकांवर परिणाम होतो.
Rate This Study Storm